छत्तीसगड - सरकारी कर्मचाऱ्यांना नियमांचे उल्लंघन होवू नये, याची काळजी घ्यावी लागते. अन्यथा प्रशासकीय कठोर कारवाई होण्याची भीती असते. मात्र छत्तीसगडमधील विजापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाने कर्मचाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. येथील जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना टी-शर्ट, जीन्स आणि भडक रंगाचे कपडे वापरण्यास मनाई केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे, नियमानुसार कर्मचाऱ्यांनी कार्यालयात सभ्य (डिसेंट) कपडे घालणे आवश्यक आहे. चतुर्थश्रेणी कर्मचारीदेखील गणवेश घालत नसल्याचे आढळून आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.
विजापूरचे जिल्हाधिकारी के.डी. कुंजम यांनी काढलेले आदेश वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत. दरम्यान सरकारी कर्मचारी संघटना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.