चंदीगढ - उत्तर प्रदेशच्या धर्तीवर हरियाणा सरकारनेही आता लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्याचे संकेत दिले आहेत. काही दिवसांपूर्वी हरियाणाच्या फरीदाबादमध्ये एका मुलीची, लग्नाला नकार दिल्याने हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण चांगलेच तापले असून, लव्ह जिहादचा आरोप करत संपूर्ण देशामध्ये या घटनेविरोधात आंदोलन सुरू आहे. यापूर्वीच योगी सरकारने आपण लव्ह जिहाद विरोधात कायदा तयार करणार असल्याचे सांगितले आहे.
हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. त्याच धर्तीवर आपण देखील लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा करणार असल्याचे म्हटले होते. आता मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी देखील लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले आहे.
मनोहर लाल खट्टर पुढे बोलताना म्हणाले की, देशभरात अशा अनेक घटना होतात, फरीदाबादमध्ये लग्न व धर्म बदलण्यास नकार दिल्यामुळे तरुणीची हत्या करण्यात आली. भविष्यात अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी लव्ह जिहाद विरोधात कायद्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आम्ही त्या दृष्टीने विचार करत आहोत.
मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना शांततेचं आवाहन
दरम्यान 5 नोव्हेंबरला हरियाणामध्ये केंद्र सरकारने तयार केलेल्या सुधारित कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोेलन करणार आहेत. यावर देखील खट्टर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे. मात्र आंदोलन करताना कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का न लावता शेतकऱ्यांनी शांततेत आंदोलन करावे असे त्यांनी म्हटले आहे.