नवी दिल्ली - भाजपकडून घोडेबाजार सुरू आहे. आमचे काही सहकारी त्यांच्या जाळ्यात फसले. भाजप २०-२० कोटींना आमदार खरेदी करतात. सरकार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मध्यप्रदेश आणि कर्नाटकसारखा खेळ राजस्थानमध्ये खेळला जात आहे, असा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला.
लोकशाहीला संपवणारे सरकार केंद्रात आहे. नवीन पिढीला वाटते, की आम्ही त्यांना प्राधान्य देत नाही. मात्र, राहुल गांधी, सोनिया गांधींसह सर्वजण त्यांना प्राधान्य देतात. तरुण आणि वरिष्ठांमध्ये चांगला संवाद होतो, असेही गेहलोत यांनी सांगितले. तसेच बहुमत असल्याचा दावा त्यांनी केला.
भाजपकडून राजस्थानचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला होता. त्यानंतर राजस्थान कॅबिनेटची बैठक बोलवण्यात आली. त्यानंतर सर्वकाही सुरळीत होईल, असे बोलले जात होते. मात्र, त्या बैठकीला सचिन पायलट अनुपस्थित होते. त्यानंतर राजस्थानमध्ये सत्ताबदल होईल, अशा चर्चा रंगल्या. शेवटी मंगळवारी काँग्रेसने बैठक घेत सचिन पायलट यांच्यावर कारवाई केली. त्यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष, अशा दोन्ही पदावरून हटविण्यात आले. तसेच त्यांच्यासह तीन मंत्र्यांना देखील पदावरून हटविले आहे. त्यानंतर सचिन पायलट यांनी मौन सोडले. 'सत्य को परेशान किया जा सकता है, पराजित नहीं', असे ट्विट केले होते.