गोरखपूर - उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथील एका नववीच्या विद्यार्थ्याचा दुहेरी हत्याकांडात हात असल्याचे समोर आले आहे. प्रकरणी या मुलाला तुरुंगात ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आधीच नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. चौकशीनंतर बुधवारी रात्री नववीतील मुलालाही ताब्यात घेण्यात आले.
24 मे रोजी बारगडवा गावात गोरा नदीजवळ कृष्णा (वय 25) आणि दिवाकर (वय 23) या दोन चुलत भावांना 9 मिमीच्या पिस्तूलने गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. याचप्रकरणी या मुलाला अटक करण्यात आले. सर्कल ऑफिसर रचना मिश्रा म्हणाल्या, माहितीच्या आधारे पोलिसांनी दुबियारी पुलाजवळील परिसर घेरला आणि आरोपीला अटक केली. त्याच्यावर आयपीसी कलम 147, 148, 149, 302, 120 बी आणि 216 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलिसांनी या मुलाला माध्यमांसमोर हजर केले होते. यावेळी या मुलाने तो नववीत शिकत असल्याचे सांगत आपले वय 17 सांगितले होते. मात्र, आता झांघा पोलीस ठाण्याचे एसएचओ अनिल कुमार सिंह म्हणाले, तो मुलगा साधारण २० वर्षांचा असल्याचे दिसते. सोबतच तो अल्पवयीन आहे, हे दर्शविण्यासाठी त्याच्या कुटुंबाला वयाचा पुरावा सादर करता आलेला नाही.