नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील खासगी रुग्णालये दिल्लीकरांसाठी राखवी ठेवण्यात येतील, असा निर्णय अरविंद केजरीवाल यांनी घेतला आहे. त्यावरून दिल्ली प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अनिल चौधरी यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. दिल्लीचा रहिवासी कोण याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
अरविंद केजरीवाल खोटे बोलल्याचा आरोपही त्यांनी केली आहे. 7 एप्रिलला झालेल्या पत्रकार परिषदेत केजरीवाल म्हणाले होते, दिल्लीमध्ये 30 हजार खाटा तयार असतील. मात्र, तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार जूनच्या शेवटीपर्यंत फक्त दीड हजार खाटांची गरज पडेल. केजरीवाल खोटे बोलत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे चौधरी म्हणाले.
'ज्यांनी दिल्लीत काम केले, दिल्लीला उभारण्यात मदत केली, त्या स्थलांतरितांवर उपचार करणार नसल्याचे केजरीवाल बोलत आहेत. अनेक स्थलांतरित दिल्लीत राहत आहेत. जर ते आजारी पडले, किंवा कोरोनाग्रस्त झाले, तर त्यांच्यावर दिल्लीत का उपचार होऊ शकत नाहीत? असे चौधरी म्हणाले.
अनेकजण बाहेरच्या राज्यातून येऊन दिल्लीत आमदार झाले आहेत. त्यांचे या निर्णयावर काय मत आहे. अरविंद केजरीवालांचे उदाहरण देत चौधरी म्हणाले, केजरीवाल नोडयामधील इंद्रपुरम येथे राहत होते. आता ते फक्त दिल्लीकरांचे उपचार करण्याची भाषा करत आहेत.