पाटणा - केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांच्यावर आज(शनिवार) साश्रूनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. गुरुवारी(८ ऑक्टोबर) दिल्लीत उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले होते. काल त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी दिल्लीहून पाटण्याला आणण्यात आले होते. पाटण्यातील गंगा नदी किनाऱ्यावरील जनार्धन घाटावर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर लोटला होता.
मुलगा चिराग याने वडिलांना मुखाग्नी दिली. यावेळी काही काळ त्यांची शुद्ध हरपली होती. एस. के पुरी येथील त्यांच्या निवास्थानापासून स्मशानभूमीपर्यंत फुलांनी सजवलेल्या वाहनात त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. यावेळी मोठा जनसमुदाय लोटला होता.
जनार्धन घाटावर चिरागसह त्याचा चुलत भाऊ प्रिंस राजही उपस्थित होता. कुटुंबातील सदस्यांसह अनेक नेतेही अंत्यसंस्कारास उपस्थित होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, केंद्रीय मंत्री अश्विन चौबे, नित्यानंद रायसह अनेक नेते उपस्थित होते.
आवडत्या नेत्याला शेवटचं पाहण्यासाठी जनता आतुर
अंत्ययात्रा सुरू असताना हजारो लोक विविध ठिकाणांवरून सहभागी झाले होते. बिहारमधील अनेक राजकीय नेते अंत्यविधीस आले होते. 'जब तक सूरज चांद रहेगा, रामविलासजी का नाम रहेगा' अशा घोषणा नागरिकांनी दिल्या. जनार्धन घाट येथे पार्थिव पोहचल्यानंतर आपल्या आवडत्या नेत्याची एक झलक पाहण्यासाठी नागिकांची गर्दी उसळली होती. शोकसागरात बुडालेल्या नागरिकांनी घोषणा देऊन परिसर निनादून सोडला होता.
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक होते. ७४ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मागील आठवड्यात त्यांच्यावर हृदयशस्त्रक्रिया झाली होती. मात्र, प्रकृती ढासळल्याने गुरुवारी त्यांचे निधन झाले.