नवी दिल्ली - गलवान परिसरातील भारत चीन सीमेवर सैनिकांच्या हाणामारीत चीनी सैनिकांचीही जिवितहाणी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. चीनमधील सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सच्या संपादकांनी या वृत्ताला दुजोरा दिल्याची माहिती समोर आली आहे. गलवान व्हॅली परिसरात सैनिकांच्या हाणामारीत चीनी सैनिकांचीही जीवितहाणी झाल्याचे मला समजले आहे, असे ट्विट संपादक हु शिजीन यांनी ट्विट केले आहे.
दरम्यान, भारत आणि चीनी लष्कराचे मेजर जनरल स्तरावरील अधिकारी सीमेवरील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोमवारी झालेल्या हाणामारीनंतर अधिकाऱ्यांत चर्चा सुरु झाल्याचे वृत्त लष्करातील सुत्रांनी दिले.
भारताला माझे सांगणे आहे की, उद्धटपणे वागू नका, आणि सीमेवरील चीनच्या संयमाला कमजोरपणा समजू नका. चीनला भारताबरोबर वाद नको आहे. मात्र, आम्ही घाबरतही नाहीत, असे हु यांनी म्हटले आहे. भारत आणि चीनी सैनिकांच्या हाणामारीत दोन्ही बाजूंनी जीवितहानी झाल्याचे अधिकृत वक्तव्य भारतीय लष्कराने दिले आहे.
1975 नंतर पहिल्यांदाच भारत चीन सीमेवर जीवितहानी झाली आहे. पूर्व लडाख मधली सीमा वादावरून दोन्ही देशांमध्ये राजनैतिक आणि लष्करी पातळीवर चर्चा सुरु आहे. मात्र, सोमवारी रात्री सैनिकांमध्ये हाणामारी झाली.