इटानगर - अरुणाचल प्रदेशमधील भारतीय सीमेमध्ये चीनच्या सेनेने प्रवेश करत, तिथला प्रदेश ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे. तवांग जिल्ह्यामधील तोस्को गावात असलेल्या यांगिकोने होली वॉटर या सीमा परिसरात ही घटना घडली. चीनची सेना वारंवार भारतातील जमीनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे.
भारतीय सेनेच्या सीमा रस्ते विभागामार्फत यांगिकोने परिसरात रस्ता बनवण्याचे काम सुरु होते. यावेळी चीनच्या सेनेने याला विरोध करत, काम थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय सेनेने त्यांना प्रत्युत्तर देत, सीमेपलीकडे हुसकावून लावले.
भारतीय सैन्याचे लेफ्टनंट जनरल, एम. एम. नरवणे यांनी याआधीच चीनला इशारा दिला आहे. चीनने भारतीय सीमेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना प्रथम भारतीय सैन्याला सामोरे जावे लागेल. आणि, चीनने १९६२च्या घटनेची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केल्यास, इतिहासाची २०० वेळा पुनरावृत्ती करण्यास भारत मागेपुढे पाहणार नाही. असे नरवणे यांनी म्हटले होते.