नवी दिल्ली - चीनच्या सैनिकांचा पूर्व लडाखमधील घुसखोरी करण्याचा प्रयत्न हाणून पाडल्यानंतर भारतामधील चीनच्या राजदूत कार्यालयाने प्रतिक्रिया दिली आहे. पूर्व लडाखमधील सीमेवरील चीनने भारतावरच घुसखोरीचा आरोप केला आहे. भारताच्या सैनिकांनी बेकायदेशीरपणे प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ असलेल्या पँगगाँग त्सो तलाव क्षेत्रात घुसखोरी केल्याचा दावा चीनच्या राजदूत कार्यालयाने केला आहे.
आघाडीवरील सैनिकांच्या तुकड्यांना भारताने नियंत्रित करावे, अशी विनंती केल्याचे चीनच्या राजदूत कार्यालयाने म्हटले आहे.
29 आणि 30 ऑगस्टला चीनकडून घुसखोरीचे प्रयत्न -
दोन्ही देशांच्या लष्करी कमांडरस्तरावर चर्चा करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येत असतानाच 29 आणि 30 ऑगस्टच्या रात्री पँगाँग लेकच्या दक्षिणेस चिनी सैन्याच्या हालचाली अचानक वाढल्या होत्या. यावेळी भारतीय सैन्याने त्यांचे घुसखोरीचे प्रयत्न रोखल्याची माहिती समोर आली होती.
सैन्यदलाने 'ही' दिली होती प्रतिक्रिया
सीमा भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारतीय सैन्य प्रयत्नशील आहे. मात्र, त्याचप्रमाणे भारत आपली प्रादेशिक अखंडता जपण्यासाठीही कटीबद्ध आहे. चुशुल येथे ब्रिगेड कमांडर स्तरीय बैठक सुरू असून सीमा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे सैन्यदलाचे प्रवक्ते अमन आनंद यांनी म्हटले होते.
लडाखच्या पूर्वेकडील पँगाँग त्सो, गलवान खोरे, डेपसंग प्लेन्स आणि गोगरा या प्रदेशांवर चीनने हक्क सांगितल्यानंतर भारत आणि चीनदरम्यान तणावाची स्थिती आहे. सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी लष्करीस्तरावर चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. मात्र, चीनच्या आडमुठ्या भूमिकेमुळे चर्चेत अडचणी येत आहेत. जुलैच्या मध्यावधीपासून सीमावादावरील चर्चा रेंगाळली आहे. पँगाँग त्सो, डेपसांग या भागातून चीन मागे हटायला तयार नसल्याने चर्चा पुढे जात नसल्याची माहिती आहे.