नवी दिल्ली : भारत- चीन सीमेवरील गलवान व्हॅली हा चीनचा प्रदेश असल्याचा दावा चिनी परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. मात्र, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने चीनचा हा दावा खोडून काढला आहे. चीनने केलेला दावा 'अतिशयोक्तीपूर्ण' आणि 'असमर्थनीय' असून लष्कराच्या 6 जूनला झालेल्या उच्चस्तरीय बैठकीतील चर्चेच्या एकदम विरोधी आहे, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
गलवान व्हॅली परिसरात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये सोमवारी रात्री झालेल्या हाणामारीत 20 भारतीय सैनिकांना विरमरण आले. त्यानंतर सीमेवरील परिस्थिती संवेदशनशिल झाली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी चीनच्या दाव्याला चोख उत्तर दिले आहे. 6 जूनला दोन्ही देशांच्या लेफ्टनंट जनरल पदावरील अधिकाऱ्यांमध्ये सीमा वादावरून बैठक झाली. त्याचा हवाला त्यांनी चीनला दिला. या बैठकीत झालेल्या चर्चेच्या विपरित चीन दावा करत असून तो कधीही मान्य करता येणार नाही, असे ते म्हणाले.
दोन्ही देशांमध्ये याआधी 1967 साली नथू ला खिंडीत चकमक झाली होती. त्यामध्ये भारताचे सुमारे 80 तर चीनच्या 300 सैनिकांची जीवितहानी झाली होती.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही चीनचे परराष्ट्र मंत्री वाँग यी यांच्याशी फोनवर चर्चा केली. 6 तारखेला झालेली निर्णय लागू करण्याची गरज असल्याचे त्यांनी चीनला सांगितले. यावेळी बोलताना जयशंकर यांनी चीनला कठोर शब्दात समाजावून सांगितले. गलवान व्हॅली परिसरात घडलेल्या घटनांमुळे भारत-चीन द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होतील. चीनने हल्ला करण्याची आधीच तयारी केली होती, त्यामुळे या संपूर्ण प्रकाराला चीन जबाबदार आहे, असे जयशंकर म्हणाले.