नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवरील फिंगर फोर भागामध्ये एक वेगळाच प्रकार दिसून आला आहे. याठिकाणी चीनी सैन्याने ठिकठिकाणी लाऊडस्पीकर लावले आहेत. विशेष म्हणजे, या लाऊडस्पीकरवरुन चीनी सैनिक चक्क पंजाबी गाणी मोठ्याने वाजवत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमेवर असलेल्या तणाव परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जवानांची गस्त वाढवण्यात आली आहे. सीमेवर सध्या २४ तास कडा पहारा ठेवण्यात येत आहे. त्यामुळे, या सैनिकांचे लक्ष विचलीत करण्याच्या दृष्टीने चीनी सैनिक ही नवी युक्ती वापरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे.
फिंगर फोर परिसरात आठ सप्टेंबरला दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान गोळीबार झाल्याची माहिती समोर आली होती. चीनी सैन्याने भारतीय सैनिकांना उकसवण्यासाठी जाणीवपूर्वक हवेत गोळीबार केल्याचे लष्कराने स्पष्ट केले होते. अशाच प्रकारच्या आणखी दोन घटना २९ ते ३१ ऑगस्टलाही झाल्या होत्या.
यानंतर दोन्ही देशांच्या लष्करादरम्यान कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चा होणार आहेत. मात्र, यासंदर्भातील बैठकीची तारीख अद्याप निश्चित करण्यात आली नाही.
हेही वाचा : श्रीनगरमध्ये चकमक : तीन दहशतवाद्यांना कंठस्नान, दोन जवान जखमी