मुंबई - देशभरामध्ये कोरोनाचे १८० रुग्ण आढळून आले आहेत. आत्तापर्यंत सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्र आणि केरळ राज्यात सापडले आहेत. इतर राज्यांमध्येही रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे देशातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी उद्या ४.०० वाजता सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधणार आहे. या बैठकीला राज्यांचे आरोग्य मंत्रीही उपस्थित राहणार आहेत.
बैठकीत देशभरातील कोरोना प्रसारा संबधी तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे. राज्य सरकारे आणि केंद्र सरकार मिळून कोरोनाचा बिमोड करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आरोग्य आणिबाणी हाताळण्यासाठी मंत्रीगटाचीही स्थापना केली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी शक्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. देशातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची परवानगी द्यावी, असे निर्देश कंपन्यांना देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे ४९ रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रसार भारतामध्ये 'सेकंड स्टेज' म्हणजेच दुसऱ्या स्तरावर पोहचला आहे. विविध राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महाराष्ट्र, तेलंगाणा, कर्नाटक, चंदीगड, छत्तीसगडमध्ये आज नव्याने रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोनाग्रस्तांची संख्या ही सुरुवातीला कमी होती. मात्र, गेल्या चार दिवसांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. आम्ही सर्वतोपरी काळजी घेत आहोत. प्रत्येकाने काळजी घ्यावी, घरी सुरक्षित रहावे. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. हा आजार दुसऱ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यात जाऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तसेच ३१ तारखेपर्यंतचे दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.