नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी कोरोनाच्या चाचण्यांचा वेग वाढवण्याची सरकारला मागणी केली आहे. आपण जर मोठ्या प्रमाणात लोकांच्या चाचण्या केल्या, आणि संक्रमित लोकांना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर उपचार केले, तरच सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनचा काही फायदा होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेमध्ये हे समोर आले होते, की सरकारची सध्याची मर्यादित चाचण्या घेण्याची रणनीती ही सदोष आहे. साथीच्या रोगांचे विशेषज्ञदेखील लवकरात लवकर आणि मोठ्या प्रमाणावर लोकांच्या चाचण्या व्हायला हव्यात, असे मत व्यक्त करताना दिसून येत आहेत. त्यामुळे सरकारने तातडीने याबाबत पावले उचलणे गरजेचे असल्याचे चिदंबरम यांनी म्हटले आहे.
जपान, दक्षिण कोरिया आणि सिंगापूरकडून धडे घेत आपणही देशामधील चाचण्या वाढवायला हव्यात. आपण मोठ्या प्रमाणात चाचण्या करून, संक्रमित लोकांना ओळखून, त्यांना तातडीने विलगीकरणात ठेऊन त्यांच्यावर उपचार केले, तरच आताच्या लॉकडाऊनचा आपल्याला फायदा होणार आहे. अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच, बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेला, चाचणी केंद्रांवर 'रॅपिड टेस्ट' सुरू करण्याचा निर्णय आज आयएमसीआरने घेतला. या निर्णयाचेही आपण स्वागत करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुलांनी केले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कौतुक