जगदलपूर - छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना ९ महिन्यानंतर उघडकीस आली आहे. ९ महिन्यापूर्वी एका अल्पवयीन मुलीवर चार नराधम तरुणांनी सामूहित अत्याचार केला. त्यातून ती गर्भवती राहिली. मात्र, आरोपींनी ते प्रकरण धमकावून दाबण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी त्या मुलीस आणि तिच्या आईस जीवे मारण्याची धमकी देण्यात येत होती. मात्र, अखेर मुलीच्या प्रसुतीची वेळ आल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले आहे.
या अत्याचार प्रकरणी भीतीच्या तणावातच पीडित मुलीच्या आई आणि मुलीने परपा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रार दाखल करायला गेल्यानंतर पोलीस ठाण्यातच त्या मुलीस प्रसुती वेदना जाणवू लागल्या. त्यावर पोलिसांनी तत्काळ तिला रुग्णालयात भर्ती केले. त्यानंतर त्या मुलीने एका मुलास जन्म दिला. मात्र, त्या नवजात अपत्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पीडित मुलीवर ९ महिन्यावर झालेल्या अत्याचार प्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे.
२ महिने वारंवार सामूहिक बलात्कार-
घटनेतील पीडित मुलीचे गावातीलच एका तरुणासोबत प्रेमसंबध होते. त्याने या मुलीस लग्नाचे अमिष दाखवून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. धक्कादायक बाब म्हणजे पुढे त्याने त्याच्या तीन मित्रांनाही बोलावून घेऊन तिच्यावर जबरदस्तीने सामूहिक अत्याचार केले. त्यानंतर या चौघांनीही त्या पीडितेस नाव बदनाम करण्याची आणि जिवे मारण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केला. हा प्रकार तब्बल २ महिने सुरू राहिला, या दरम्यान पीडित मुलगी गर्भवती राहिली. याबाबत माहिती होताच चौघांनीही त्या अल्पवयीन पीडितेस धमकावायला सुरू केले.
चारही आरोपी सधन घरातील आहेत. परिणामी गावातील पंचांनी सातत्याने पीडिता आणि तिच्या आईवर अनावश्यक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, हा सर्व अत्याचार सहन न झाल्याने अखेर त्या पीडित कुटुंबाने पोलीस ठाणे गाठून झालेल्या अत्याचाराची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाती चारही आरोपींना अटक केली आहे. यातील ३ आरोपी यापूर्वीही कारागृहात जाऊन आले आहेत.