रायपूर - छत्तीसगढ सरकारने शाळेत देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनात अंड्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. राज्यात लहान मुलांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी अंड्यांचा आहारात समावेश करण्यात आला होता. परंतु, विरोधी पक्षात असलेल्या भाजप नेत्यांसह काही सामाजिक संघटनांनी सरकारच्या या निर्णयाला जोरदार विरोध केला आहे.
शिक्षणमंत्री प्रेमसाई सिंह तेकाम याबाबत बोलताना म्हणाले, संपूर्ण राज्यात लहान मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण ४० टक्के आहे. या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी आम्ही त्यांना प्रथिनयुक्त आहार देण्याचा निर्णय घेतला आहे. काही सामाजिक संघटना आणि भाजप नेते कबीर पंत यांनी सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे. याप्रकरणी आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेणार आहोत.
छत्तीसगढ सरकारच्या या निर्णयाला भाजप नेते कबीर पंत यांनी जोरदार विरोध केला. यानंतर, छत्तीसगढ सरकारने कबीर पंत यांच्याशी चर्चा करण्यासाठी ४ सदस्यीय कमिटीचा स्थापना केली आहे. यामध्ये गृहमंत्री ताम्रध्वज साहु, शिक्षणमंत्री प्रेमसाई सिंह तेकाम, महिला कल्याणमंत्री अनिला भेडिया आणि शिव कुमार दहारिया यांचा समावेश आहे. परंतु, कबीर पंत यांच्याशी चर्चा करुनही अद्याप याबाबत काहीही निर्णय झाला नाही.
माजी मुख्यमंत्री रमन सिंह यांनीही निर्णयाला विरोध करताना म्हटले आहे, की प्रत्येक नागरिकाच्या धार्मिक भावना आहेत. त्यामुळे या निर्णयावर पुनर्विचार केला पाहिजे. दुधातही प्रथिनांचे भरपूर प्रमाण असते. त्यामुळे अंड्याऐवजी दुधाचाही आहारात समावेश केला जावू शकतो.
दामाखंड येथे असलेले कबीर आश्रमातील दया शंकर यांनी निर्णयाचा विरोध करताना म्हटले आहे, की मांसाहारी अन्नाला प्रोत्साहन देण्याचा हा निर्णय आहे. कुपोषणाला लढत देण्यासाठी शाकाहारी पदार्थांचा पर्यायही उपलब्ध आहेत. शाळा हे शिक्षणाचे मंदिर आहे. त्यामुळे या मंदिरात कोणतेही मांसाहारी अन्नाला परवानगी देता कामा नये. सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही. तर, आम्ही याविरोधात आंदोलन करणार आहोत.