कोंडगाव (छत्तीसगड) - कालपासून समाज माध्यमावर एक फोटो खूप व्हायरल होत आहे. काँग्रेसच्या राज्यसभेतील खासदार फुलंदेवी नेताम यांनी आपल्या कोंडगाव या गावी शेतामध्ये भाताची लावणी केली. यासंबंधीचा फोटो छत्तीसगडच्या आरोग्यमंत्र्यांनी ट्वीट करून त्यांचे कौतुक केले आहे. फुलंदेवी या बस्तर जिल्ह्यातील आदिवासी समाजातून येतात. त्या मार्च 2020मध्ये काँग्रेसकडून राज्यसभेवर बिनविरोध निवडून आल्या आहेत.
फुलंदेवी म्हणाल्या, की कोरोनामुळे शेतामध्य मजूर मिळणे कठीण जात आहे. त्यामुळे मी स्वत: च भाताची लावणी करण्याचे ठरवले. मी एका शेतकरी कुटुंबातील आहे. सुरुवातीपासून मी शेतात काम करत आले आहे. मला शेतातील कामे करण्याची कधीच लाज वाटत नाही.
फोटोमध्ये खासदार फुलंदेवी शेतामध्ये शिरून भात लावणी करताना पाहायला मिळत आहेत. यावरून छत्तीसगडचे आरोग्य मंत्री टी. एस. सिंग देव यांनी त्यांचे ट्वीटरवरून कौतुक केले आहे. देव म्हणाले, की काँग्रेस असा पक्ष आहे, ज्यामध्ये तळागाळातील नेतृत्त्वाला संधी दिली जाते.