चमोली (उत्तराखंड)- कोरोनाचा परिणाम शिखांचे पवित्र तीर्थस्थळ हेमकुंड साहिब यात्रेवर झाला आहे. लॉकडाऊनमुळे हेमकुंड साहिब रस्त्यावर साचलेला बर्फ हटवण्याचे काम सुरु झाले नाही. यामुळे हेमकुंड साहिब यात्रेच्या तारखांमध्ये बदल होऊ शकतो.
कोरोनामुळे हेमकुंड साहिब येथील सर्व व्यवस्थांवर परिणाम झाला आहे. साधारणपणे यात्रामार्गावरील बर्फ हटवण्याचे काम एप्रिलमध्ये सुरू होते. मात्र, यावेळी कोरोनामुळे ते अद्याप सुरू झाले नाही. यामुळे हेमकुंड साहिबचे कपाट निश्चित वेळेनंतर उघडले जातील. बर्फ हटवण्याचे काम सैन्यदल आणि हेमकुंड ट्रस्टच्या लोकंकाकडून केले जाते.
घांघरिया ते पुढे हेमकुंडपर्यंत रस्त्यावर बर्फ साचला आहे. लॉकडाऊन असल्यामुळे सेवादार आणि सैन्यदलाचे जवान बर्फ हटवण्यासाठी पोहोचले नाहीत. 3 मे नंतर हेमकुंड साहिब यात्रेबद्दल नवीन तारखांची घोषणा होईल, असे हेमकुंड गुरुद्वारा प्रबंधन समितीचे प्रबंधक सरदार सेवा सिंह यांनी सांगितले.
साधारणपणे हेमकुंड साहिब यात्रेची तयारी एप्रिल महिन्यात सुरु होते आणि 25 मे रोजी हेमकुंड साहिबचे कपाट उघडले जातात. मात्र यावेळी कोरोनामुळे वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. हेमकुंड साहिब शिखांचे पवित्र धार्मिक स्थळ आहे. हेमकुंड साहिब समुद्रसपाटीपासून 4329 मीटर उंचीवर आहे. हेमकुंड यात्रेला जाताना बर्फ असलेल्या मार्गातून जावे लागते. इथे 7-8 महिने बर्फ असतो. हेमकुंड साहिब उत्तराखंडच्या गढवालमध्ये आहे. येथे देश विदेशातील शीख भाविक येतात.