मुंबई - 'चांद्रयान- २' या भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळयानाचे प्रक्षेपण काही तासांवर आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून 'चांद्रयान-२' चे प्रक्षेपण झाल्यानंतर चंद्रावर पोहोचण्यासाठी यानाला ४० दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागणार आहे.
या मोहिमेचा खर्च अंदाजे 600 कोटी पेक्षा जास्त येणार आहे. मात्र भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत मोजल्यास, प्रत्येक भारतीयामागे एका वडापावएवढाच खर्च या मोहिमेला लागणार आहे. फक्त 10 रुपये एका भारतीयाच्या पाठी पकडू शकतो, असे शास्त्रज्ञ जतीन राठोड यांनी सांगितले.
चंद्रापासून ३० किलोमीटर इतक्या अंतरावर गेल्यानंतर 'चांद्रयान-२' ची गती कमी होणार आहे. लँडर चंद्राच्या भूमीवर उतरवण्यात इस्रोचा कस लागणार आहे. हीच शेवटची १५ मिनिटे महत्त्वाची ठरणार आहेत. भारत सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी झाल्यास असे करणारा तो जगातील चौथा देश ठरणार आहे. आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन हे देश यात यशस्वी झाले आहेत.