नवी दिल्ली : चांद्रयान-३ या देशाच्या तिसऱ्या चांद्रमोहिमेमध्ये 'ऑर्बिटर'चा समावेश नसणार आहे. मात्र, यात लँडर आणि रोव्हर असणार आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री (अवकाश विभाग) जितेंद्र सिंह यांनी रविवारी दिली. २०२१च्या सुरुवातीला याच प्रक्षेपण होऊ शकते, असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
चांद्रयान-२ मोहिमेनंतर यावर्षीच चांद्रयान-३चे प्रक्षेपण करण्याचा इस्रोचा मानस होता. मात्र, कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे इस्रोच्या अनेक योजना पुढे ढकलल्या गेल्या आहेत. चांद्रयान-३ हे चांद्रयान-२ प्रमाणेच असेल, मात्र यात ऑर्बिटरचा समावेश नसेल असे सिंह यांनी स्पष्ट केले.
मागील वर्षी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ने चांद्रयान-२ चे प्रक्षेपण केले होते. या मोहिमेमधील 'विक्रम लँडर' हे याच दिवशी (७ सप्टेंबर) चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग करण्यात अयशस्वी ठरले होते. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यापूर्वीच त्याच्याशी असलेला संपर्क तुटला होता. त्यानंतर ते चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले होते. मात्र हे इस्रोचे अपयश नसून, चांद्रयान-२ मधील ऑर्बिटर हे सुस्थितीत असून ते आवश्यक ती माहिती पाठवत असल्याचे इस्रोने स्पष्ट केले आहे.
यासोबतच, 'गगनयान' या देशाच्या पहिल्या वाहिल्या मानवी अंतराळ मोहिमेची तयारीही प्रगतीपथावर आहे. यासाठी अंतराळवीरांचे प्रशिक्षण आणि इतर प्रक्रिया सुरू आहेत. गगनयानचे लॉंच २०२२मध्ये करण्याचा इस्रोचा मानस होता. मात्र, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे या मोहीमेचे कामही बरेच लांबले होते. मात्र आता अधिक वेगाने तयारी करत २०२२पर्यंत याची तयारी पूर्ण करण्याचा प्रयत्न इस्रो करत असल्याचेही सिंह यांनी सांगितले.
दरम्यान, देशाचे पहिले चांद्र अभियान, 'चांद्रयान-१'ने चंद्राची काही नवी छायाचित्रे पाठवली आहेत. चंद्राच्या दोन्ही ध्रुवांवरील पृष्ठभाग गंजल्याचे या छायाचित्रांमधून दिसून येत आहे. चंद्राच्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात लोह असल्याची आपल्याला आधीपासून माहिती आहे. विशेष म्हणजे, पाणी आणि ऑक्सिजनशिवाय लोहाला गंज चढू शकत नाही. त्यामुळे ही छायाचित्रे म्हणजे चंद्रावर पाणी आणि ऑक्सिजनचे अंश असल्याचे संकेत असल्याचा दावा सिंह यांनी केला आहे.
हेही वाचा : चंद्राच्या ध्रुवांवर आढळले गंजाचे नमुने; पृष्ठभागावर पाणी आणि ऑक्सिजन असल्याचे संकेत