पटना - बिहारच्या चंपारण भागाला स्वतःचा असा मोठा इतिहास आहे. महात्मा गांधींनी आपले पहिले सत्याग्रह आंदोलन इथेच केले होते. त्यामुळेच, चंपारणला गांधीजींची कर्मभूमी म्हणूनही ओळखले जाते.
मोतिहारीमध्ये पोहोचल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना बाजूच्या जसौलीपट्टी गावात एका शेतकऱ्याला मारहाण झाल्याची माहिती मिळाली. हे कळताच, ते तातडीने हत्तीवरून त्या गावात निघाले. त्या गावात जात असताना, वाटेत चंद्राहिया गावात त्यांना डब्ल्यू. बी. हेकॉक या अधिकाऱ्याचे पत्र मिळाले, ज्यामध्ये त्यांना परत फिरण्याचा आदेश दिला गेला होता. मात्र, गांधीजींनी या आदेशाला धुडकावले. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली.
त्यानंतर, चंपारणमधील लोक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याबाहेर जमा झाले, आणि त्यांनी आंदोलन सुरू केले. परिणामी, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून गांधीजींना सोडून देण्यात आले. गांधीजींनी त्यानंतर २९०० गावांमध्ये फिरून १३,००० शेतकऱ्यांचे म्हणणे नोंदवून घेतले.
महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे ब्रिटिशांना शेतकऱ्यांवरील जाचक कर मागे घ्यावे लागले. याच आंदोलनानंतर, गांधीजींना लोक 'महात्मा' म्हणू लागले.
हेही पहा : गांधींपासून प्रेरणा घेऊन दरोडेखोरांनी स्वीकारला होता अहिंसेचा मार्ग