नवी दिल्ली - काँग्रेसचे वरिष्ठ नेते मनिशंकर अय्यर आपल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून नेहमी चर्चेत असतात. अय्यर यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख 'चायवाला' असा केला होता. मात्र, त्यांनी या वक्तव्यावरून आता घुमजाम केला आहे. मी मोदींचा उल्लेख चायवाला असा कधी केलाच नाही, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे, असे अय्यर म्हणाले.
जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम हटवण्याच्या पार्श्वभूमीवर मनिशंकर अय्यर 'ईटीव्ही भारत'ला मुलाखत देत होते. यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नामुळे अय्यर यांचा तिळपापड झाल्याचे पाहायला मिळाले. तालकटोरा स्टेडियमवर सभेला संबोधित करताना अय्यर यांनी मोदींचा उल्लेख चायवाला असा केला होता. मात्र, आता त्यांनी असे वक्तव्य केले नसल्याचे म्हटले आहे. मोदी निवडणूक हरणार आहेत, त्यामुळे त्यांना चहा विकायची इच्छा असेल तर आम्ही त्यांना मदत करु, असे मी म्हणालो होतो. मात्र, मोदींना चायवाला असे म्हणालो नाही, असं अय्यर म्हणाले.
यावर 'ईटीव्ही'च्या प्रतिनिधीने प्रतिप्रश्न करताचा अय्यर चांगलेच भडकल्याचे दिसले. तुम्ही मला काश्मीरविषयी बोलण्यासाठी निमंत्रित केले आहे. त्यामुळे तुम्ही फक्त तेच प्रश्न विचारा, असे ते म्हणाले.
मी कोणते प्रश्न विचारायचे आणि कोणते नाही, याचे निर्देशन तुम्ही मला देऊ शकत नाही, असे उत्तर 'ईटीव्ही'च्या प्रतिनिधीकडून मिळताच अय्यर यांनी पुन्हा आपला बालिशपणा दाखवत चित्रविचित्र आवाज काढत प्रतिनिधीचे पाय धरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अय्यर यांनी मुलाखतीतून काढता पाय घेतला.