नवी दिल्ली - जागतिक महामारी आली असताना केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने नवे राष्ट्रीय वैज्ञानिक, तंत्रज्ञान आणि नवसंशोधन धोरण (STIP 2020) तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी सरकार विविध तज्ज्ञ आणि इतर घटकांशी चर्चा करणार आहे.
नवे राष्ट्रीय वैज्ञानिक, तंत्रज्ञान आणि नवसंशोधन धोरण तयार करण्यासाठी सरकारचे वेगवेगळे विभाग एकत्रित काम करणार आहेत. यामध्ये भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार कार्यालय आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा समावेश आहे. केंद्र सरकारने विकेंद्रीकरण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचबरोबर नवे धोरण तयार करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने म्हटले की, संकटामुळे जग बदलत आहे. नवे धोरण हे विकेंद्रीकरण पद्धतीने होणार आहे. यामध्ये विविध क्षेत्रनिहाय लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्राधान्य निश्चित करण्यात येणार आहे. तसेच संशोधनाची पद्धत निश्चित करण्यात येणार आहे. त्याचा उपयोग हा मोठ्या प्रमाणात सामाजिक आर्थिक कल्याणासाठी होणार असल्याचे म्हटले आहे.
नव्या धोरणामध्ये मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आणि तज्ज्ञांची चर्चेची प्रक्रिया व्हावी यासाठी वैज्ञानिक धोरण मंचरचा वापर केला जाणार आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांकडून आणि तज्ज्ञांकडून मते विचारात घेतली जाणार आहेत. त्यानंतर नव्या वैज्ञानिक धोरणाचा कच्चा आराखडा तयार करण्यात येणार आहे.
दरम्यान, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नवे वैज्ञानिक धोरण अस्तित्वात येणार असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे.