पलामू - झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या चरणातील प्रचारातील शेवटचे ६ दिवस बाकी आहेत. जसजसा प्रचार वाढत आहे, तसतसे नेत्यांचे बोलणे आणि एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप तीव्र होताना दिसत आहेत. केंद्रीय कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी यांनी पलामू येथील एका जाहीर सभेमध्ये गांधी परिवार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. देशातील गरिबीसाठी गांधी परिवारच जबाबदार असल्याचे ते म्हणाले.
गडकरी पलामू येथील बिश्रामपूर येथे जाहीर सभेला संबोधित करत होते. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांनी 'गरिबी हटाओ'चा नारा दिला. मात्र, गरिबी हटली नाही, अशी टीका नितीन गडकरी यांनी केली.
यानंतर गडकरी यांनी राहुल गांधींवर वैयक्तिक आरोपही केले. त्यांनी राज्याचे आरोग्य मंत्री रामचंद्र चंद्रवंशी यांना मत देण्याचे आवाहन केले. त्यांनी यादरम्यान मंडल धरणाविषयीही मुद्दा उपस्थित केला. तसेच, आपल्या पातळीवर या धरणाला मंजुरी मिळाली आहे, असे ते म्हणाले.