वायनाड - जिल्ह्यातील अनेक मांजरे मृतावस्थेत आढळली आहेत. त्यामुळे, मननाथवाडी आणि मेपड्डी भागातील रहिवासी घाबरून गेले. काही नागरिकांनी या घटनेबद्दल अधिकाऱ्यांना माहिती दिली. ज्यानंतर पशुसंवर्धन विभागाने या माजरांच्या शरीरांचे नमुने तपासणीसाठी घेतले.
अहवालातून या मांजरांना फिलीन पार्व्हो व्हायरस झाल्याचे समोर आले. या विषाणूचा माणसांवर प्रभाव होत नाही. त्यामुळे, चिंतेची बाब नसल्याचे विभागाने जाहीर केले. वायनाडचे मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डी. रामचंद्रन यांनी सांगितले, की हा विषाणू मांजरांमध्ये आढळून येतो. यावर लसदेखील उपलब्ध असून हा व्हायरस आटोक्यात आणता येऊ शकतो.
मांजराच्या एका मालकाने सांगितले, की मेपड्डीमध्ये गेल्या 3 ते 4 दिवसात 13 हून अधिक मांजरांचा मृत्यू झाला आहे. या मांजरांचा मृत्यू कोरोनामुळे होत असल्याचा परिसरातील नागरिकांचा समज झाला होता. त्यामुळे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.