नवी दिल्ली - सध्या देशभरात कोरोनाचे सावट पसरले आहे. या गंभीर महामारीला संपवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करताहेत. तर, प्रशासनाला या संकटाच्या वेळी सामाजिक जबाबदारी म्हणून देशभरातून अनेकजण पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये पैसे जमा करत आहेत. परंतु, काही फसव्या वृत्तीचे लोक याचा फायदा उठवत आहेत. आधी खोट्या लिंक पाठवून फसवणूक करण्याच्या घटना पुढे येत होत्या. मात्र, आता परिस्थितीचा फायदा घेत चक्क पंतप्रधान सहाय्यता निधीच्या नावावर नकली युपीआय आयडी बनवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या खोट्या लिंकला समाजमाध्यमाद्वारे पसरवून लोकांना पैसे दान करण्याबाबत सांगितले जात आहे. तर, या लिंकद्वारे दान करण्यात आलेली रक्कम ही सरळ फसवणूक करणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात जाते. याबाबत सायबर सेलने गुन्हा दाखल केला आहे.
खरी आयडी (pmcares@sbi)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना या संकटकाळी देशाला आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्याकरता pmcares@sbi अशा प्रकारची एक युपीआय आयडी तयार करण्यात आली आणि नागरिकांना त्यात पैसे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. याद्वारे जमा करण्यात आलेला निधी हा सरळ पंतप्रधान सहायत्ता निधीमध्ये जमा होईल असे सांगण्यात आले होते. मात्र, आता पंतप्रधान सहाय्यता निधी नावाने बनवण्यात आलेल्या युपीआय आयडीसारखी एक नकली आयडी तयार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
खोटी नकली आयडी (pmcare@sbi)
कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी अनेकजण त्यांच्यापरिने जमेल तितकी रक्कम पंतप्रधान रिलीफ फंडमध्ये जमा करत आहेत. मात्र, याच संधीचा फायदा काही भामटे घेत आहेत. त्यांनी संधी साधून पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी तयार करण्यात आलेल्या युपीआय आयडीसारखाच मिळताजुळता दुसरा आयडी तयार केला. pmcare@sbi असे या फेक आयडीची लिंक आहे. यानंतर, समाजमाध्यमांद्वारे ही आयडी सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यात आली, जेणेकरुन नागरिक या लिंकच्या माध्यमातून पैसे दान करतील. मात्र, या लिंकद्वारे जमा केलेली रक्कम ही सहाय्यता निधीत न जाता फसवणूक करणाऱ्याच्या खात्यात जमा व्हायची. परंतू, एका जणाला यावर शंका येताचे त्याने या युपीआय आयडीची माहिती दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलला दिली.
या प्रकाराची माहिती, मिळताच सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी संबंधित बँक अधिकाऱ्यांशी संपर्क करून या फेक आयडीला त्वरित बंद केले. सोबतच सायबर सेलने या प्रकाराबाबत एफआयआर दाखल केला असून या आयडीला तयार करणाऱ्या भामट्याच्या शोधात पोलीस आहेत. याच सोबत ऑनलाईन पैसे जमा करताना, दान करताना नागरिकांनी संबंधित युपीआय आयडी आणि बँक खाते हे व्यवस्थित तपासून घ्यावे, असे आवाहन पोलिसांनी जनतेला केले आहे.