पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान २८ ऑक्टोबरला होणार आहे. तत्पूर्वी या टप्प्यातील प्रचाराचा आज अंतिम दिवस होता. पहिल्या टप्प्यात ७१ विधानसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. त्याच्या प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी ५ वाजता थंडावल्या आहेत. मतदानाच्या प्रार्श्वभूमीवर निवडणूक प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे.
पहिल्या टप्प्यासाठी १ हजार ६६ उमेदवार रिंगणात
२८ ऑक्टोबरला होणाऱ्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात एकूण १ हजार ६६ उमेदवार रिंगणात आहेत. बुधवारी २८ ऑक्टोबरला सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात होईल. मात्र, वेगवेगळ्या मतदारसंघात मतदान संपण्याचा कालावधी वेगवेगळा निश्चित करण्यात आला आहे.
बिहारमध्ये एकूण 7.29 कोटी मतदार संख्या -
बिहार राज्यात एकूण 7.29 कोटी मतदार आहेत. यात महिला मतदारांची संख्या 3.36 कोटी आहे. पुरुष मतदारांची संख्या 3.76 इतकी आहे. राज्यात एकूण 243 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे.
हे चार गठबंधन आहेत रिंगणात
- राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन (एनडीए)
- महागठबंधन
- प्रगतिशील लोकतांत्रिक गठबंधन
- राष्ट्रीय लोक समता पार्टी
नक्षल प्रभावित मतदारसंघाची हेलिकॉप्टरने निगरानी-
पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव नक्षल प्रभावित मतदारसंघात अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे. कोणत्याही आपतकालीन घटनेस तोंड देण्यासाठी २४ तास सुरू राहणारी कंट्रोल रुम उभारण्यात आली आहे. नक्षल प्रभावित भागात नजर ठेवण्यासाठी २ हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले असल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.