दिब्रुगढ - आसाम जिल्हा प्रशासनाने दिब्रुगढ पालिका परिसरातील संचारबंदी शिथिल केली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत संचारबंदी राहणार नाही. त्यामुळे जनजीवन सामान्य होण्यास मदत होणार आहे. आसाम, त्रिपुरा, मेघालयसह ईशान्येकडील राज्यांमध्ये नागरिकत्व कायदा सुधारणा विधेयकाच्या पार्श्वभूमीवर जोरदार निदर्शने आणि सरकारचा निषेध सुरू आहे.
या विधेयकाला विरोध करत संपूर्ण ईशान्य भारत रस्त्यावर उतरला आहे. येथे जाळपोळ, आंदोलने, रॅली आणि जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. काल निदर्शकांचा जमाव आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला होता. यात तिघांचा मृत्यू झाला आहे. आंदोलकांनी माजुली जिल्ह्यातील भाजप मुख्यालयावर हल्ला केला आहे. माजुली जिल्हा मुख्यमंत्री सर्बनंद सोनोवाल यांचा मतदारसंघ आहे.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा दलांची दमछाक होत आहे. सध्या सुरक्षेच्या कारणास्तव मोबाईल, इंटरनेट सेवा बंद आहेत. आसाममधील १० जिल्ह्यांमध्ये यात आणखी ४८ तासांची वाढ करण्यात आली आहे.
आसाम विधानसभेतील काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते देबब्रत सैकिया यांनी अध्यक्ष हितेंद्रनाथ गोस्वामी यांना विधेयकावर लोकांकडून सुरू असलेल्या तीव्र निषेधाशी संबंधित बाबींवर चर्चा करण्यासाठी विशेष सत्र ठेवण्याची मागणी केली आहे.
एका बाजूला हा सर्व निषेध सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आसाममधील जनतेला 'तुमचे अधिकार हिरावून घेतले जाणार नाहीत, सांस्कृतिक ओळख कायम राहील, त्याला धक्का पोहोचणार नाही' असे आश्वासन दिले आहे.