पणजी - माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनामुळे पणजी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. परंतु, याला महाराष्ट्रवादी गोमंतकचे (मगो) ढवळीकर कुटुंब जबाबदार आहे. त्यांनी मगोच्या केंद्रीय समितीला विचारात न घेता 'पर्रिकर मुख्यमंत्री होणार असतील तर पाठिंबा देण्याचे' भाजपला वचन दिले होते. त्यामुळे पणजीत दुसऱ्यांदा पोटनिवडणूक होत आहे. याचा खर्च ढवळीकर बंधूंकडून वसूल करावा, असे लवू मामलेदार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. आठवड्यापूर्वी मामलेदार यांना मगो सरचिटणीस पदावरून काढून टाकत सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
'गोव्यातील बहुजन समाजाच्या विकासासाठी भाऊसाहेब बांदोडकर यांनी मगो पक्षाची स्थापन केली होती. मगो आता बहुजनांचा पक्ष राहिला नसून ढवळीकर बंधूंनी हा पक्ष विक्रीस काढला आहे. भाऊसाहेबांच्या तत्वांना तिलांजली दिली गेली आहे,' असे मामलेदार म्हणाले. मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर छोट्या समुदायाच्या लोकांना संपविण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. 'जेव्हा दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा पक्षांतर विरोधासाठी न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, तत्पूर्वी वाळपई मतदारसंघात झालेल्या पक्षांतराविरोधात काहीच हरकत घेतली नाही,' असे ते म्हणाले.
मामलेदार यांनी ढवळीकर यांच्यावर संधीसाधूपणाचा आरोप केला आहे. 'भाजपने सुदिन ढवळीकर यांना पक्षातून काढून टाकल्यामुळे मगोने सुडापोटी काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे. मात्र, त्यांची ही कृती पक्षातील अन्य नेत्यांना पटलेली नाही. त्यामुळे येत्या काळात याचे पडसाद दिसून येतील. मला अन्यपक्षातून बोलावणे येत आहे. परंतु, मी मगोमधून बाहेर पडणार नाही. कारण, मी बाहेर पडलो तर विषय भरकटून जाईल,' असेही मामलेदार यांनी सांगितले.
यावेळी नाईक यांच्यासोबत मागील आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश केलेले जयदीप शिरोडकर आणि गुरुनाथ नाईक उपस्थित होते.
मामलेदार यांनी पोलिस खात्यातील उपअधीक्षक पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेत मगोमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर २०१२ मध्ये फोंडा मतदारसंघातून ते आमादार म्हणून निवडून आले होते. मात्र, अलीकडे झालेल्या सत्तानाट्यादरम्यान, त्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रावर आक्षेप घेत त्यांची मगोमधून हकालपट्टी करण्यात आली आहे.