जयपूर - एका भावाने आपल्या मित्रांच्या मदतीने मानसिक दिव्यांग बहिणीवर लैंगिक अत्याचार करुन तिचा खून केला. मनोहर ठाणा परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी भावासह चौघांना अटक केली आहे.
मनोहर ठाणा परिसरात अनेक विट भट्टी कामगार काम करतात. १७ मे पासून येथील एक मानसिक दिव्यांग असलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. १८ मे ला कुटुंबीयांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, एका नाल्याजवळ त्यांना मुलीचे कपडे आढळले. त्याआधारे अधिक तपास केला असता, मिश्रवास जंगलात अल्पवयीन मुलीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत मिळाला. मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी संशयाच्या आधारावर नातेवाईकांची चौकशी सुरू केली.
आरोपीने पोलिसांना सुरुवातीला उडवा-उडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर आरोपी भावाने गुन्हा कबुल केला. पीडित मुलगी मानसिक दिव्यांग असल्याने कुटुंबातील सर्वजण तिला कंटाळले होते. म्हणून आरोपी भावाने मित्रांच्या मदतीने मुलीला जंगलात नेले. तिच्यावर सामुहिक अत्याचार करुन तिचा खून केला.