बंगळुरू - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कर्नाटक सरकारने केलेली लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी, लोकांना आवश्यक वस्तूंचा पुरवठा आणि कर्नाटक सरकारच्या इतर विविध उपाययोजनांची ब्रिटिश मंत्र्यांनी प्रशंसा केली. रविवारी इंग्लंडमध्ये राहणाऱ्या कन्नड नागिरकांसोबत मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी बकलँडही मुख्यमंत्र्यांसोबतच्या या चर्चेसाठी हजर झाले.
लॉर्ड चांसलर आणि न्याय राज्य सचिव रॉबर्ट बकलँड यांनी कर्नाटक सरकारने कोरोना विषाणूच्या नायनाटासाठी केलेल्या उपाययोजनांची प्रशंसा केली. त्यांनी भारतात विशेषत: कर्नाटकमध्ये या आजाराच्या नियंत्रणाविषयी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच नागरिकांच्या पाठिंब्यामुळेच लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी करणे शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार येत्या काही काळात टप्प्याटप्प्याने किंवा श्रेणीबद्ध पद्धतीने आर्थिक कामे सुरू केली जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोनाने कर्नाटकातील ग्रामीण भागांमध्ये अद्याप शिरकाव केलेला नाही, हे ऐकून बकलँड आश्चर्यचकित झाले. आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू झाल्यावर परदेशात अडकलेल्या कर्नाटकच्या नागरिकांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारशी संपर्क साधणार असल्याचे येडियुरप्पा यांनी स्पष्ट केले.