नवी दिल्ली - लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर एका कमांडिंग अधिकाऱ्यासह २० सैनिकांच्या दुर्दैवी मृत्युमुळे परिस्थितीचे गांभीर्य भारतात जाणवले आहे. १९६२पासून भारत आणि चीनदरम्यान कदाचित हा सर्वात मोठा पेचप्रसंग असून दोन्ही देशांच्या संबंधांवर त्याचे दीर्घकालीन परिणाम होणार आहेत. सामान्य जनतेला नेहमीच प्रश्नाचा मूळ आधार, त्या क्षेत्राची भौगोलिकता आणि दोन्ही सैन्य सध्याचा संघर्ष कशा पद्धतीने हाताळतील, हे जाणून घेण्याची इच्छा असते. त्याबद्दलचे हे थोडक्यात स्पष्टीकरण..
प्रत्यक्ष नियंत्रण रेषा -
१९६२च्या युद्धादरम्यान, चिनी सैन्याने ३८,००० चौरस किलोमीटर क्षेत्र बळकावले. त्यानंतर चिनी घुसखोरीमुळे तयार करण्यात आलेल्या प्रत्यक्षातील सीमेला नंतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणण्यात येऊ लागले. ही प्रत्यक्ष नियंत्रण रेषा नकाशात सीमांकित केलेली नव्हती किंवा प्रत्यक्ष जमिनीवरही खुणा केलेल्या नव्हत्या. त्यामुळे दोन्ही बाजूंचे विशिष्ट क्षेत्रातील एलएसीबाबत भिन्न दृष्टिकोन आहेत.
भारतीय आणि चिनी सैन्य आपापल्या समजुतीनुसार एलएसीवर गस्त घालत असते आणि ज्या क्षेत्रात मतभेद आहेत, तेथे दोन्ही बाजूंची गस्तपथके नेहमीच समोरासमोर येत असतात. हे समोरासमोरचे संघर्ष शांततापूर्ण मार्गाने निकालात निघावेत, यासाठी दोन्ही बाजूंनी सैनिकांच्या वर्तनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी अनेक करार आणि प्रोटोकॉल्स आहेत. उदाहरणार्थ, २०१३ च्या सीमा संरक्षण सहकार्य करारातील परिच्छेद ८ असे म्हणतो की, दोन्ही देशांची सीमा संरक्षण दले जेव्हा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत सामायिक सामंजस्य नाही, अशा क्षेत्रात समोरासमोर आले तर दोन्ही देशांनी स्वतःहून जास्तीत जास्त संयम पाळावा, त्यांनी कोणत्याही प्रक्षोभक कृत्यापासून स्वतःला दूर ठेवावे, दुसऱ्या बाजूविरोधात बळाचा वापर करू नये किंवा त्याचा वापर करण्याची धमकी देऊ नये, उभय बाजूंना सौदार्हाने वागवावे आणि गोळीबार किंवा सशस्त्र संघर्ष टाळावा.
दोन्ही देशांकडून या नियमावलीचे कडकपणे पालन करण्यात आल्याने १९७५ पासून एलएसी शांततापूर्ण राहण्याबाबत सुनिश्चिती करण्यात आली. त्यावर्षी मात्र ४ भारतीय जवान सीमेवरील चकमकीत मारले गेले. मेच्या पहिल्या आठवड्यात घडलेल्या चिनी घुसखोरीमुळे परिस्थिती अचानक बदलली आहे.
पूर्व लडाखची भौगोलिक रचना -
लडाखला उंचावरील वाळवंट, असे म्हटले जाते. पूर्व लडाखचे क्षेत्र हे तिबेटच्या पठाराला लागून आहे. पँगॉंग त्सो सरोवर आणि गलवान नदीचे खोरे १४,००० फूट उंचीवर असून गरम पाण्याच्या झऱ्याचे क्षेत्र १५,५०० फूट उंचीवर आहे. या तीन क्षेत्रांत सध्या चिनी सैन्याशी संघर्ष सुरू आहे.
सध्या प्रामुख्याने पँगॉंग त्सो आणि गलवान खोऱ्यात तणाव निर्माण झाला आहे. पँगॉंग त्सो सरोवराच्या उत्तर काठावर, भारत आणि चीन यांच्या एलएसीबाबत वेगवेगळ्या समजुती आहेत. पूर्वी दोन्ही देश आपापल्या संबंधित दावा सांगितलेल्या क्षेत्रांमध्ये गस्त घालत होते. चीनचा दावा आहे की, एलएसी फिंगर फोरवर आहे तर भारताचा दावा ती फिंगर ८ वर आहे. सध्याच्या घडीला, चिनी सैनिकांनी त्यांनी दावा केलेल्या क्षेत्राला प्रत्यक्षात व्यापून टाकले आहे. आमच्या माहितीनुसार एलएसीच्या भागात भारतीय सैन्याला गस्त घालण्यासाठी परिणामकारकरित्या प्रवेश नाकारला आहे.
गलवान खोऱ्यातील एलएसी ही भारताच्या एका महत्वाच्या रस्त्यापासून अंदाजे ६ किलोमीटर अंतरावर आहे. हा रस्ता जगातील सर्वात उंच धावपट्टी असलेल्या दौलत बेग ओल्डीकडे जातो. सर्व मोसमात उपयोगी पडणारा असा हा एकमेव रस्ता आहे. ज्याद्वारे डीबीओवर तैनात असलेल्या भारतीय सैनिकांना कुमक पाठवली जाते. दारबुकपासून सुरू होणारा हा रस्ता २५० किलोमीटर अंतराचा असून तो डीबीओला पोहचतो. २००० मध्ये या रस्त्याचे बांधकाम सुरू झाले पण श्योक नदीवर पूल नसल्याने लष्करासाठी त्याचा वापर करण्यास खीळ बसली. २०१९ मध्ये तेथे कायमस्वरूपी पूल बांधण्यात आला आणि संरक्षण मंत्र्यांनी त्याचे उद्घाटन केले. लडाखच्या उत्तर भागांमध्ये भारतीय सैनिक आणि लष्करी साहित्य अगदी जलदीने पोहचवता येत असल्याने या रस्त्याला डावपेचात्मक असाधारण महत्व प्राप्त झाले आहे.
चिनी सैनिकांनी गलवान खोऱ्यातून एलएसीवर प्रवेश केल्यास ते हा महत्वाचा रस्ता बंद करू शकतात. आपच्या क्षेत्रांमध्ये घुसखोरी करण्याच्या चिनी सैनिकांच्या प्रयत्नांना आमच्या सैनिकांनी जोरदार विरोध केला आहे आणि १५ जूनला असाच संघर्ष झाला ज्यात भारताचे २० सैनिक शहिद झाले.
परिस्थिती कितपत गंभीर आहे?
यापूर्वीही चिनी सैनिकांनी घुसखोरीचे अनेक प्रयत्न केले आहेत. त्यातील काहींची परिणती २०१३ मधील देसपांग येथील, २०१४ मधील चुमार आणि २०१७ मधील डोकलाममधील संघर्षात झाली आहे. मात्र, हे स्थानिक संघर्ष होते जे शांततापूर्ण मार्गाने सोडवण्यात आले आणि दोन्ही बाजूंकडून कोणताही हिंसाचार झाला नाहि. परंतु सध्याच्या चिनच्या हालचाली संपूर्णपणे वेगळ्या आहेत.
एलएसीच्या विविध भागांमध्ये चिनी सैनिकांची जमवाजमव मोठ्या संख्येने आहे. स्वाभाविकपणे चीन सरकारच्या सर्वोच्च पातळीवरून त्यास मंजुरी देण्यात आली आहे. चिनी लष्कराच्या हालचालींच्या सोबत त्यांचा हिंसाचार हा अभूतपूर्व आहे आणि दोन्ही सैनिकांच्या वर्तनाबाबत ज्या नियमावली केल्या आहेत, त्याचा भंग करण्यात आला आहे.
एलएसीवर भारतीय सैनिकांच्या वर्तनाबाबत मार्गदर्शन करणाऱ्या नियमांचा चिनी सैन्याच्या हालचालीमुळे फेरआढावा घेण्याची वेळ आली आहे. चीन येत्या काळात अधिक आक्रमक होण्याची पूर्ण शक्यता आहे. याचे सीमेवरील व्यवस्थापनावर दीर्घकालीन परिणाम होणार आहेत. किमान येणारे काही दिवस भविष्यात तरी आपल्याला एलएसीवरील स्थिती पेटलेली दिसेल.
यामध्ये भारत आणि चीन यांच्यातील संबंधांचे स्वरूप आणि दर्जा यांचे नुकसान होणारच आहेत. त्याची चिन्हे आताच दिसू लागली आहेत. देशभरात चीनविरोधात संताप व्यक्त होत आहे.
(लेखक डी. एस. हुडा हे उत्तर कमांडचे माजी प्रमुख असून २०१६ मधील लक्ष्यभेदी हल्ल्यांचे त्यांनी नेतृत्व केले आहे.)