नवी दिल्ली - कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे स्थलांतरीत मजुरांचे हाल होत असून त्यांनी आपल्या घराची वाट धरली आहे. स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या मूळ राज्यात सोडण्यासाठी सरकारकडून विशेष श्रमिक रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. आज उत्तर प्रदेशमधील मेरठ रेल्वे स्थानकांवर शेकडो स्थलांतरीत मजूर बिहारला परत जाण्यासाठी दाखल झाले.
आपल्या राज्यात परत जाण्यासाठी हजारो कामगार मेरठ रेल्वे स्थानकांवर जमले. पोलीस अधिकाऱ्यांनी सर्वांना एकमेकांपासून सोशल डिस्टन्सं पाळण्याचे आवाहन केले. मात्र, हजारोच्या संख्येने लोक आल्यामुळे सोशल डिस्टंन्स पाळण्यातही अडचण येत आहे.
रेल्वे स्थानकावर प्रत्येक स्थलांतरित कामगाराला मास्क आणि जेवण मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण स्टेशनची स्वच्छताही करण्यात आली आहे. श्रमिक कामगारांना घेण्यासाठी रेल्वे सायंकाळी 4 वाजता मेरठ स्थानकांवर येणार आहे.
लॉकडाऊनचा देशातील जनतेवर आणि त्यातही विशेषतः कामगार, मजूर आणि हातावर पोट असणाऱ्यांवर संकट कोसळले आहे. भारतात लाखो कामगारांचे जीवन हे रोज मिळणाऱ्या कामावर असून त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांचा दिवस कसाबसा जातो. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात पोट भागवणार कसं? हा यक्षप्रश्न या मजूर वर्गासमोर आ वासून उभा राहिला.