हैदराबाद - भारत आणि चीनमधील संबंध सीमाप्रश्नावरू सध्या ताणले आहेत. चिनी सैन्याने गलवान व्हॅलीमध्ये केलेल्या हल्ल्यात भारतीय जवानांना वीरमरण आल्यानंतर संपूर्ण देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. चीनचा निषेध म्हणून चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. मात्र, चिनी मालावर बहिष्कार जरी घातला तरी त्यांच्या अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नाही, असे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम म्हणाले.
भारत शक्य तितका स्वावलंबी बनला पाहिजे. मात्र, याचा अर्थ असा होत नाही की, संपूर्ण जगापासून आपण विलग व्हावे. सीमेवरील तणावामुळे आपण जागतिक व्यापाराची शृंखला तोडू शकत नाही. चीन सोबत व्यापारी संबंध तोडले तर बाजारपेठांवर मोठा ताण येईल. चीन फक्त भारतासोबतच व्यापार करत नाही. चीनच्या एकूण जागतिक व्यापाराचा भारत एक लहानसा भाग आहे. त्यामुळे भारताने चीनी मालावर बहिष्कार टाकला तरी, त्यांच्या अर्थव्यवस्थेवर फारसा फरक पडणार नाही, असे चिंदबरम यांनी सांगितले.
सध्या संरक्षणासारख्या अत्यंत गंभीर विषयांवर उभय देशांमध्ये चर्चा सुरू आहेत. अशा परिस्थितीत बहिष्कारासारखे विषय मध्ये आणल्यास चर्चा योग्य पद्धतीने होणार नाही, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लडाखमधील भारतीय हद्दीत घुसखोरी झाली नसल्याचे स्पष्ट केले. ही बाब नक्कीच प्रत्येकाला गोंधळात टाकणारी आहे. आत्ता चीनने संपूर्ण गलवान व्हॅलीवर आपला हक्क दाखवला आहे. याला सरकारकडे काय उत्तर आहे? असा प्रश्न चिंदबरम यांनी उपस्थित केला. भारताने आत्ताच चीनचा दावा खोडून काढला नाही तर, भविष्यात याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील, असे माजी अर्थमंत्री म्हणाले.