जयपूर - राजस्थानामधील जैसलमेर जिल्ह्यात लष्कराच्या फायरिंग रेंजमध्ये बॉम्बस्फोट होऊन तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. रामदेवरा पोलीस ठाणे क्षेत्रातील ओगार गावाजवळ ही घटना घडली. बॉम्बच्या आवाजाने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जणावरांसाठी चारा आणायला गेलेल्या युवकांनी बॉम्बसदृष्य वस्तू तोडण्याचा प्रयत्न केल्याने स्फोटात तिघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना काल(बुधवारी) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.
पोखरण फायरिंग रेंजमधून एक कच्चा रस्ता जातो. त्या रस्त्याने तीन युवक ट्रक्टरमधून जणावरांना चारा आणण्यासाठी गेले होते. माघारी येत असताना त्यांना भंगारात पडलेले बॉम्बसदृष्य साहित्य दिसले. त्या वस्तूला तोडण्याचा प्रयत्न केला असता मोठा स्फोट झाला. यात त्यांचा मृत्यू झाला. स्फोटामध्ये तिघांचे शरीर छिन्नविच्छीन्न झाले.
घटनेची माहिती मिळताच पोखरण पोलीस उपअधिक्षक मोटाराम गोदारा घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी पाठविले. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.