भोपाळ - मध्यप्रदेशातील आगर मालवा जिल्ह्यात बोट पलटी झाल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (बुधवार) घडली. एका कार्यक्रमावरून माघारी येताना टील्लर धरणात बोट बुडाली. दोन जणांचे मृतदेह हाती आले असून तीन जण अद्यापही बेपत्ता आहेत. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी धरणाकडे धाव घेतली.
वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल
बोट बुडाल्याची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. त्यानंतर गावकऱ्यांनी धरणाकडे धाव घेतली. तसेच पोलिसांनाही माहिती देण्यात आली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक नवल सिंह सिसोदिया यांच्यासह वरिष्ठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृत सर्वजण फतेहपूर मेंडकी गावातील होते. नुमा लकडी येथून कार्यक्रमावरून बोटीने माघारी येताना बोट बुडाली. त्यामुळे पाचही जणांचा बुडून मृत्यू झाला. यामध्ये तीन बालकांचा आणि दोन महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.