नवी दिल्ली - आम आदमी पक्षाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केले. अमित शाह यांच्या आदेशावरून भाजपाच्या गुंडांनी आज (गुरुवार) दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानावर हल्ला केला. पोलिसांना हाताशी धरून भाजपने हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज आणि अतिशी यांनी पत्रकार परिषद घेत केला.
पोलिसांच्या मदतीने भाजपाने हल्ला केला -
मनीष सिसोदिया निवासस्थानी नसताना त्यांच्या परिवारावर हल्ला करण्यात आला. पोलिसांच्या आदेशानंतर त्यांच्या घरासमोरील बॅरिकेड हटवण्यात आले आणि गुंडांना आत जाऊ दिले. भारतीय जनता पक्षाच्या गुंडाना आणि पोलिसांना आदेश देणारा कोण आहे? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आदेशावरून हा हल्ला झाला, असा आरोप आपचे प्रवक्त्या अतिशी यांनी केला.
अतिशी यांनी पत्रकार परिषदेत काही व्हिडिओही दाखविले. यामध्ये भाजप कार्यकर्ते गेटमधून बळजबरीने आत जाताना दिसत आहेत. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्ते घरात शिरले. पोलिसांनी या गुंडांना आत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केले नाही. उलट त्यांना संरक्षण दिले, असे अतिशी म्हणाल्या.