कोलकाता - पश्चिम बंगाल राज्यात भाजपा कार्यकर्त्याची तृणमूल काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याने गोळी घालून हत्या केली आहे. किनकार मांझी असे मृत्यू झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. हावडा जिल्ह्यात ही घटना घडली. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
जमीन वादातून झाली हत्या
जिल्ह्यातील बगनान पोलीस ठाणे क्षेत्रातील चंदनपारा भागात ही घटना घडली. किनकार मांझी (५२) फुलांचे व्यापारी होते. शनिवारी रात्री कामावरून माघारी येताना तृणमूल काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता परितोश मांझी आणि इतर सहकाऱ्यांनी किनकार यास रस्त्यात अडवून गोळीबार केला. आरोपी मृताचे शेजारी असल्याची माहिती समोर आली आहे. जमीन वादातून हत्या झाल्याचे बोलले जात आहे.
गोळीबारानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. परिसरातील नागरिकांनी जखमी अवस्थेत भाजपा कार्यकर्त्याला रुग्णालयात हलवले. 'उलबेरिया सुपर स्पेशालिटी' रुग्णालयात त्याला भरती करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी 'महासप्तमी' रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारादरम्यान कार्यकर्त्याचा मृत्यू झाला.
राजकीय हिंसाचार भाजपचा दावा
भाजपा कार्यकर्त्याची हत्या झाल्यानंतर हे प्रकरण राजकीय हिंसाचाराचे असल्याचा दावा भाजपाने केला आहे. तर यामागे दुसरे कारण नसून फक्त जमीन वादातून हत्या झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. ठार मारण्यात आलेल्या भाजपा कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी आल्याचे स्थानिक भाजप नेते अनुमप मलिक यांनी दावा केला.