नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकी बरोबरच देशातल्या ११ राज्यांत जवळपास ५४ जागांसाठी पोटनिवडणूक झाल्या होत्या. या निवडणुकांतही भाजपाने बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. मध्य प्रदेशात भाजपाने मुसंडी मारत सत्ता राखण्यात यश मिळवले आहेत. तर गुजरातमधील ८ ही जागा भाजपाने जिंकल्या.
मध्य प्रदेशात सत्ता राखण्यात यश -
मध्य प्रदेशातील २८ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. या पैकी १९ जागांवर भाजपाने विजय नोंदवला आहे. तर काँग्रेसला ९ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंदीयांच्या बंडानंतर काँग्रेसच्या जवळपास २६ आमदारांनी राजिनामा दिला होता. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. कमलनाथ जावून शिवराजसिंह यांची सत्ता आली. त्यामुळे ही पोटनिवडणूक भाजपा आणि काँग्रेससाठी महत्वाची होती. त्यात भाजपाने बाजी मारत सत्ता कायम राखली आहे.
गुजरातमध्ये काँग्रेसला धोबीपछाड -
गुजरातमध्ये ही भाजपाने ८ ही जागा जिंकत काँग्रेसला धोबीपछाड दिली आहे. काँग्रेसच्या ८ आमदारांनी राजिनामा दिल्याने या ठिकाणी पोटनिवडणूक झाली होती.
उत्तर प्रदेशमध्येही भाजपाची सरशी -
उत्तर प्रदेश विधानसभेच्या सात जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली. यात भाजपाची सरशी झाली आहे. सात पैकी सहा जागांवर भाजपाने बाजी मारली आहे. तर समाजवादी पक्षाच्या पदरात एक जागा पडली आहे. बसपा आणि काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला.
कर्नाटक, तेलंगाणा, मणिपूरमध्येही कमळ फुलले -
कर्नाटकच्या २ जागाही भाजपाने जिंकल्या आहेत. तर मणिपुरच्या ५ जागां पैकी ४ जागांवर भाजपाने जिंकल्या आहेत. तर १ ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. काँग्रेसच्या ५ आमदारांनी राजिनामा दिल्याने या ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या होत्या. तर तेलंगाणामध्ये टीआरएसच्या आमदाराचा मृत्यू झाल्याने झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे.
हरियाणा - छत्तीसगडमध्ये काँग्रेसला दिलासा -
हरियाणा आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने आपल्या जागा राखल्या आहे. हरियाणातील बारोडाची जागा काँग्रेसने जिंकली आहे. इथे भाजपाचे उमेदवार योगेश्वर दत्त यांना १० हजारा पेक्षा जास्त मतांनी पराभव स्विकारावा लागला. तर छत्तीसगडमध्ये जनता काँग्रेसच्या ताब्यात असलेली जागा काँग्रेसने हिसकावून घेत विजय नोंदवला.
झारखंडमध्ये ही काँग्रेसला दिलासा -
झारखंड विधानसभेच्या दोन जांगाचा निकाल जाहीर झाला आहे. इथे झारखंड मुक्ती मोर्चाने दुमका तर काँग्रेसने बेरमो मतदारसंघात विजय नोंदवला आहे. इथे भाजपाच्या उमेदवारांना मोठ्या फरकाने पराभूत व्हावे लागले.
नागालँडमध्ये सत्तारूढ पक्षाची बाजी -
नागालँडमध्येही दोन जागांसाठी पोटनिवडणूक झाली. त्यात सत्तारूढ एनडीपीपीने एक जागा जिंकली आहे. तर एका जागेवर अपक्षाने बाजी मारली आहे.