राजकोट - युवा काँग्रेस नेता हार्दिक पटेलने भाजपचा आपल्याला ठार करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. सुरेंद्रनगर येथील आक्रोश सभेत एका व्यक्तीने भरसभेत हार्दिक पटेलला कानशिलात लगावल्यानंतर त्याने हा आरोप केला आहे.
'भाजपचा माझ्यावर हल्ला करण्याचा आणि मला ठार करण्याचा प्रयत्न आहे. हरेन पांड्या यालाही अशाच प्रकारे खोट्या चकमकीत ठार करण्यात आले होते. मला मारणाऱ्या माणसाचे फेसबुक प्रोफाईल तुम्ही पाहू शकता. तो भाजप नेत्यांशी संबंधित आहे, हे तुमच्या लक्षात येईल,' असे हार्दिक पटेल याने म्हटले आहे.
हार्दिकचे भाषण सुरू असताना त्याला एका व्यक्तीने व्यासपीठावर चढून कानशिलात लगावली होती. सुरेंद्रनगरचे पोलीस अधीक्षक महेंद्र बघेटिया यांनी याबाबत माहिती दिली. 'हार्दिक यांना कानशिलात लगावणारी व्यक्ती कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही. पोलिसांनी याविषयी तपास केला आहे. तो एक सर्वसाधारण नागरिक आहे,' असे त्यांनी सांगितले.