शिमला - लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूका झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचाराला गती आली आहे. दरम्यान विविध जागी सभांना संबोधित करताना विरोधी पक्षांवर टीका करते वेळी काही नेते भान हरपून बरळतानाही दिसत आहेत. हिमाचल प्रदेशच्या भाजप अध्यक्षांनी तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसाठी चक्क आईवरून अपशब्द वापरले आहेत. यानंतर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
हिमाचल प्रदेश येथील सोलन येथे भाजपची एक जाहीरसभा होती. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतपाल सत्ती यांचे भाषण होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना धारेवर धरण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी गांधी यांच्या विरोधात इतक्या खालच्या पातळीवर भाष्य केले. मात्र, एक जबाबदार माध्यम संस्था म्हणून ते येथे लिहिणे शक्य नाही.
सत्ती यांनी या व्यतिरिक्त काँग्रेसवर ताशेरे ओढले आहेत. पंतप्रधान मोदी यांना अनेक वेळा चोर म्हटल्यावरुन त्यांनी टीका केली. स्वतः आणि स्वतःची आई जामीनावर बाहेर आहेत. मोदींवर कोणत्याही प्रकारचा साधा गुन्हाही दाखल नाही. मग राहुल गांधी स्वतः न्यायाधीश बनून, अशा प्रकारचा निर्णय देणारे कोण? पंतप्रधानांना चोर म्हणणारे गांधी यांना शिव्या देत आहेत, असे सत्ती म्हणाले मात्र यानंतर त्यांची जीभ घसरली आणि राहुल गांधींबद्दल त्यांनी चक्क अपशब्द वापरले. सत्ती यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण मंडपात कार्यकर्ते हसत होते. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे देशाचे राजकारण तापण्याची शक्यता आहे.