पाटणा - भाजपमधील बंडखोर नेते आणि सुप्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आज काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. मागच्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी पाटणा साहिब या मतदार संघातून भाजपच्या तिकिटीवर निवडणूक लढवली होती. मात्र, भाजपच्या कार्यपद्धतीवर ते पूर्वीपासूनच सडकून प्रहार करत आले आहेत. तर, भाजपनेही सिन्हांना उमेदवारी देणे टाळले आहे.
भाजपसह एनडीए पक्षांनी शनिवारी बिहारच्या ४० पैकी ३९ जागांवर उमेदवारी घोषित केली. या उमेदवारांमध्ये शत्रुघ्न सिन्हांचा पत्ता कट झाला आहे. पाटणा साहिब येथून मागच्या वेळी सिन्हा यांनी निवडणूक लढवली होती. त्यात ते प्रचंड मतांनी वजयी ठरले होते. मात्र, पक्षाविरोधात बंडखोरीमुळे ते भाजप नेत्यांची डोकेदुखी झाले होते. त्यानंतर पाटणा मतदार संघातून केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पक्षाने सिन्हांना बाहेरचा रस्ता दाखवल्याचे म्हटले जात आहे.
शत्रुघ्न सिन्हा या वर्षीच्या सुरुवातीलाच झालेल्या ममता बॅनर्जी यांच्या भाजप विरोधी आणि सर्व पक्षीय सभेमध्ये हजर होते. त्यावेळी त्यांनी भाजपला चांगलेच फैलावर घेतले होते. तसेच ते राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांचेही जवळचे मानले जातात. बिहारच्या एनडीए पक्षांमध्ये नितीश कुमारांची जनता दल युनाईटेड आणि भाजपने प्रत्येकी १७ जागा वाटून घेतल्या आहेत. तर रामविलास पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी ६ जागांवर निवडणूक लढवणार आहे.