नवी दिल्ली - मागील काही दिवसांपासून सरकारकडून सातत्याने इंधन दरवाढ होत आहे, यावरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. संकट काळातही सरकारला नागरिकांच्या पाकीटातून पैसे काढण्यातच स्वारस्य असल्याची खोचक टीका त्यांनी मोदी सरकारवर केली.
राजधानी दिल्लीमध्ये प्रथमच डिझेलच्या किमती 80 रुपये लिटरच्या पुढे गेल्या आहेत. ऑईल कंपन्यांकडून मागील 19 दिवसांपासून सतत दर वाढविण्यात येत आहे, तब्बल 10 रुपये 63 पैसे डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. तर पेट्रोलच्या किमती लिटरमागे 8.66 रुपयांनी वाढल्या आहेत. यावरून प्रियंका गांधींनी सरकारला लक्ष्य केले.
भाजपने सलग 19 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे. यातून स्पष्ट होते की, संकट असतानाही भाजपला फक्त नागरिकांच्या पाकिटातून पैसे काढण्यातच स्वारस्य आहे, असे ट्विट प्रियंका गांधी यांनी केले. उत्तरप्रदेशात नागरिकांनी मोठे आंदोलन उभारले आहे. नागरिक ही लूट सहन करणार नाहीत, असेही त्या म्हणाल्या.
राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर 79.92 रुपये प्रति लिटर झाले असून डिझेलचा दर पहिल्यांदाच 80 रुपयांच्या पुढे जाऊन 80.02 रुपये प्रति लिटर झाले आहेत. डिझेलचे दर नेहमी पेट्रोलच्या दरापेक्षा कमी असतात, मात्र, आता पेट्रोलपेक्षा डिझेल महाग झाले आहे. राज्या राज्यांमध्ये या दरात तफावत आहे.
29 जूनला काँग्रेस कार्यकर्ते मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत सकाळी 10 ते 12 या वेळात प्रत्येक जिल्हा मुख्यालयासमोर इंधन दर वाढीविरोधात आंदोलन करतील. ही दरवाढ माघारी घेण्यासाठी आंदोलन करण्यात येईल, असे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी के. सी. वेणूगोपाल यांनी सांगितले.