नवी दिल्ली - केरळमध्ये तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर 30 किलो सोने जप्त करण्यात आले होते. घटनेनंतर आरोपी स्वप्ना सुरेश आणि संदीप नायर फरार झाले होते. त्यावरून भाजप आणि काँग्रेसने केरळ सरकारला घेरले आहे. राज्यात लॉकडाऊन असताना आरोपींनी पळ कसा काढला, असा सवाल दोन्ही पक्षांनी उपस्थित केला आहे. दरम्यान शनिवारी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
लॉकडाऊनमध्ये सामान्य नागरिकाला प्रवास पास घ्यावा लागते. तसेच ठिकठिकाणी पोलीस तपासणी करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये सहजपणे स्वप्ना आणि संदीप यांनी पोलिसांना चुकवून बंगळुरु कसे गाठले. त्यांना कोणी मदत केली, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना केला. तर आरोपी केरळ आणि तामिळनाडू सिमा ओलांडून बंगळुरुला कसे पोहचले, असा सवाल काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, आरोपी संदीप नायर यांच्या अरुविक्करा येथील निवासस्थानी सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून छापा टाकला जात आहे. शनिवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) नायरला ताब्यात घेतले. तसेच रविवारी स्वप्ना सुरेशची कोची येथील एनआयएच्या कार्यालयात चौकशी होणार आहे. तिच्या कुटुंबातील सदस्यांनाही एनआयएने ताब्यात घेतले असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
तिरुअंनतपूरम विमानतळावर तब्बल 30 किलोची सोने तस्करी पकडण्यात आली होती. राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सामानामधून ही तस्करी करण्यात आली होती. तस्करीच्या रॅकेटमधील मुख्य संशयित स्वप्ना सुरेश ही राज्यातील सत्ताधारी माकपच्या डाव्या लोकशाही आघाडी सरकारची निकटवर्ती मानली जाते. कोट्यवधींच्या या सोने तस्करी रॅकेट प्रकरणातून मालामाल झालेल्यांची नावं शोधण्यात येत आहेत. या प्रकरणावरून विरोधी पक्ष सातत्याने मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी दबाव टाकत आहे. तसेच सरकार स्वप्ना हिचा बचाव करत असल्याची टीकाही विरोधी पक्षाकडून केली जात आहे.