नवी दिल्ली - काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी-वाड्रा यांच्यावर भाजपने सलग दुसऱ्या दिवशी जमीन व्यवहारासंदर्भातील कथित घोटाळ्याशी संबंधित असल्याचा आरोप केला आहे. रॉबर्ट वाड्रा यांच्याशी संबंधित सर्व जमीन घोटाळ्यात राहुल गांधी पूर्णपणे त्यांच्या सोबत होते, असा दावा भाजपने केला आहे.
भाजपचे वरिष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले, बुधवारी केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी यांनी गांधी कुटुंबाशी संबंधित जमीन खरेदी प्रकरण उपस्थित केले होते. यावर उत्तर देताना काँग्रेसने म्हटले आहे, की राहुल गांधी यांनी जमीन खरेदी केली आणि अपल्या बहिणीला भेट दिली. मात्र, मुद्दा जमीन खरेदीचा नाहीच, तर ती जमीन नेमकी कुणाकडून खरेदी केली हा आहे. जमीन एकाच व्यक्तीकडून खरेदी केली. गेली हाही मुख्य मुद्दा आहे. गांधी कुटुंबीयांसोबत जमीन खरेदीत सहभागी असलेले एच. एल. पाहवा, संजय भंडारी आणि सी. सी. थंपी. हे तिघेही ईडीच्या (सक्त वसुली संचालनालय) चौकशीच्या कक्षेत आहेत, असेही प्रसाद म्हणाले.
काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधताना प्रसाद म्हणाले, राहुल गांधींनी राफेलचा मुद्दा का उचलून धरला आहे. आता हे स्पष्ट झाले आहे.