गांधीनगर : भारतीय जनता पक्षाच्या गुजरात प्रदेश अध्यक्षपदी एका मराठी माणसाची वर्णी लागली आहे. सी. आर. पाटील यांना भाजपच्या गुजरात प्रदेश अध्यक्षपदी नेमण्यात आले आहे. ते गुजरातमधील नवसारीचे खासदार आहेत.
चंद्रकांत रघुनाथ पाटील यांचा जन्म १६ मार्च १९५५साली महाराष्ट्रातील जळगावमध्ये झाला. आयटीआय सूरतमधून त्यांनी तांत्रिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर १९८९मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. ते देशातील पहिले खासदार आहेत ज्यांना आपल्या कार्यकाळासाठी आयएसओ ९००१-२००८ नामांकन मिळाले आहे.

पाटील यांच्या रुपाने कित्येक वर्षांनंतर दक्षिण गुजरातमधील नेत्याची प्रदेश अध्यक्षपदी निवड झाली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी याबाबत घोषणा केली. माजी प्रदेश अध्यक्ष जीतू वाघाणी यांचा कार्यकाळ यापूर्वीच समाप्त झाला होता. मात्र, कोरोना महामारी आणि राज्यसभा निवडणुका या सर्वाच्या पार्श्वभूमीवर नवीन अध्यक्ष निवडण्यास उशीर झाला.
पटेल विरुद्ध पाटील..
गुजरातमध्ये येत्या काळात विधानसभेच्या आठ जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत. तेव्हा भाजपचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष पाटील आणि काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांची रणनीती पहायला मिळणार आहे.
हेही वाचा : सचिन पायलट कुचकामी आणि दगाबाज; गहलोत यांचे गंभीर वक्तव्य..