मुंबई - केरळ राज्यातील सिपीएम पक्षाचे प्रमुख बलाकृष्णन कोडीएरी यांचा मुलगा बिनोय कोडीएरी याच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या ओशिवरा पोलिसांनी एका 33 वर्षाच्या महिलेवर बलात्कार करण्याचा गुन्हा दाखल आहे. पुढील तापसाकरता ओशिवरा पोलिसांना बिनोय कोडीएरी हा डीएनए टेस्ट साठी रक्ताचे नमुने देण्यास टाळाटाळ करत असताना सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रणजित मोरे व न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने बिनोय यास जेजे रुग्णालयात रक्ताचे नमुने देण्याचे आदेश दिले होते.याला अनुसरून मंगळवारी जेजे रुग्णालयात बिनोय कोडीएरी हा रक्ताचे नमुने देण्यास हजर होता.
एका पीडित महिलेने बलात्काराचा गुन्हा नोंदवीत आपल्याला बिनोयकडून मुलगा झाल्याचे तक्रारीत म्हटले होते. या प्रकरणी दिंडोशी न्यायालयात बिनोय कोडीएरी याच्या वकिलांमार्फत अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यात बिनोय कोडीएरी यास दिंडोशी न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. बिनोय कोडीएरी यास आठवड्यातील प्रत्येक सोमवारी ओशिवरा पोलीस ठाण्यात महिनाभर हजेरी द्यावी लागणार असून पोलिसांना तापासत सहकार्य करावे लागणार आहे. मात्र, या अटी असतानाही बिनोय आजारपणाचे कारण देत रक्ताचे नमुने देण्यास टाळाटाळ करत होता.
काय आहे प्रकरण ?
एका 33 वर्षीय पीडित महिला बिनोय कोडीएरी याच्या संपर्कात दुबईमधील एका डान्स बारच्या माध्यमातून आली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर आपण अविवाहित असून आपल्यासोबत शरीरसंबंध ठेवल्यास लग्न करू असे बिनोय पीडित महिलेला सांगत असे. बिनोयच्या भूलथापांना बळी पडलेल्या पीडित महिलेने 2009 पासून 2015 पर्यंत बिनोयसोबत शरीर संबंध ठेवले होते ज्यात त्यांना अपत्य झाले होते. मात्र 2015 सालापासून दुबईतील बांधकाम व्यवसायात तोटा होत असल्याचे कारण देत बिनोय याने पीडित महिलेला पैसे देण्यास नकार दिला असता सदर पीडितेने बोनोयला लग्न करण्यास सांगितले. या दरम्यान पीडितेच्या घरच्यांना बिनोय भेटत होता मात्र पीडितेला स्वतःच्या घरच्यांशी ओळख मात्र करून देत नव्हता. बिनोय याच्या सोशल माध्यमांवरील माहितीवरून तो अगोदरच विवाहित असून त्यास दोन मुलं असल्याचे पीडितेच्या लक्षात आले.
या प्रकरणी वेळोवेळी लग्नाचा तगादा लावूनही आरोपी लग्न करत नसून खर्चास पैसे देत नसल्याने सदर पीडित महिलेने ओशिवरा पोलिसांकडे बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.