पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता जोरात सुरू आहे. सर्व पक्ष प्रचारामध्ये व्यग्र आहेत. उद्या म्हणजेच शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीही प्रचाराच्या मैदानात तोफ डागणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मोहिमेची सुरुवात रोहतास जिल्ह्यातील डेहरीच्या बियाडा मैदानापासून करतील, तेथे ते एका सभेला संबोधित करतील. त्यानंतर ते गयाच्या गांधी मैदानावर पोहोचतील जिथे ते दुसर्या सभेला संबोधित करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार निवडणुकीत 12 सभांना संबोधित करणार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार पंतप्रधानांच्या जवळपास सर्व सभांना उपस्थित राहणार असल्याचे एका भाजप नेत्याने सांगितले.
हेही वाचा - रशियन स्पुटनिक लसीची चाचणी घेणाऱ्या डॉ. रेड्डी लॅबवर 'सायबर हल्ला'
तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी दोन सभांना संबोधित करतील. काँग्रेस नेते प्रेमचंद्र मिश्रा म्हणाले की, राहुल गांधी शुक्रवारी नवादा येथील हिनसुआ येथे आपली पहिली सभा घेतील, तर त्यांची दुसरी सभा कहलगाव येथे होईल. त्यांनी सांगितले की आरजेडी नेते तेजस्वी यादव हे त्यांच्या समवेत हिनसुआ येथे असतील.
२४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेसाठी तीन टप्प्यात निवडणूक होत आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी मतदान होईल, तर मतमोजणी १० नोव्हेंबरला होईल. पहिल्या टप्प्यात २८ नोव्हेंबरला ७१ विधानसभा जागांसाठी मतदान होईल, तर दुसऱ्या टप्प्यात ३ नोव्हेंबरला ९४ जागांसाठी आणि शेवटच्या टप्प्यात ७ नोव्हेंबरला ७८ जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत, राजद काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या साथीने लढत असून भाजप आणि जेडीयूसह इतर चार पक्ष त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
हेही वाचा - बिहार विधानसभा : लोकजनशक्ती पक्षाकडून रोजगार देण्याचे आश्वासन