पाटणा(बिहार)- तालिबान आणि जैश-ए-मोहम्मदचे अतिरेकी नेपाळच्या सीमेवरुन राज्यात घुसण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे बिहार स्पेशल ब्रँचने हाय अलर्ट जारी केला आहे.
पाकिस्तानी लष्कराने प्रशिक्षित केलेले तालिबान आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांचे 5 ते 6 दहशतवादी बिहारमध्ये पाठवण्याचा आयएसआयचा प्लॅन असल्याची माहिती मिळाल्यानंतर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा(एनआयए)च्या नियंत्रण कक्षाला मिळालेल्या ईं-मेलमध्ये भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री हिट लिस्टवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे राज्यातील काश्मिरी दहशतवादी, मुस्लीम मुलतत्ववादी संघटना उदा. जैश-ए-मोहम्मद, अल कायदा, पाकिस्तानी, अफगाणिस्तानमधील जिहादी दहशतवादी संघटना, इस्लामिक दहशतवादी संघटना, डाव्या संघटनांचे जहाल गट, उत्तर पुर्वेतील बंडखोर गट, देशाच्या सुरक्षेला धोका असणारे घटक यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अतिमहत्वाच्या व्यक्तींचे राज्याच्या विविध भागातील दौरे पुर्ण होईपर्यंत कडेकोट बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील अतिमहत्वाच्या ठिकाणांवरील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
स्थानिक पोलीस ठाण्यांना देखील याबाबत माहिती देण्यात आल्याचे बिहार स्पेशल ब्रँचने सांगितले आहे.