पाटणा - बिहार येथील एका सनदी अधिकार्याने भाजप आमदाराला लॉकडाऊनदरम्यान प्रवासी परवाना दिल्याबद्दल त्याला निलंबित करण्यात आले आहे. या अधिकाऱ्याने भाजप आमदाराच्या मुलीला कोटा येथून परत आणण्यासाठी हा परवाना दिला असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राज्यातील विरोधी पक्षांनी नितीशकुमार सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.
मंगळवारी उशिरा नवाडा जिल्ह्यातील सदर येथील उपविभागीय अधिकारी अनुप कुमार यांच्या विरोधात राज्य प्रशासन विभागाकडून जारी केलेल्या निवेदनात त्यांना निलंबित केल्याचे म्हटले आहे बिहार मध्ये विरोधी राजकीय पक्षांनी सरकारला या प्रकरणावरून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्यानंतर तातडीने ही कारवाई करण्यात आली.
कोणत्याही अतिमहत्त्वाच्या कारणाशिवाय राज्यात किंवा राज्याबाहेरचा प्रवासी परवाना दिल्याप्रकरणी कुमार दोषी आढळल्याचे या निवेदनात म्हटले आहे लॉक डाऊनच्या काळामध्ये अति महत्त्वाच्या किंवा अतिशय गंभीर परिस्थितीशिवाय आणि प्रवास करण्याची अत्यावश्यक गरज असल्याशिवाय असा परवाना देणे ही बाब गंभीर असल्याचेही यात म्हटले आहे. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची जाणीव असतानाही हिसुआ विधान सभा मतदार संघाचे आमदार अनिल सिंह यांना हा परवाना दिला होता. याचा वापर करून सिंह यांनी 15 एप्रिलला राजस्थानला जाऊन एका दिवसानंतर त्यांच्या 17 वर्षीय मुलीला परत आणले होते.
आमदार सिंह यांची मुलगी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी शिकवणी वर्गासाठी कोटा येथे गेली होती. तिच्या वसतीगृहामध्ये राहणारे इतर काहीजण एक-एक करून निघून जाण्यास सुरुवात झाल्यानंतर ती तिथे राहण्यास घाबरली होती. यामुळे आमदार सिंह यांनी स्वतः तिथे जात तिला परत आणले. दरम्यान, सिंह यांना भाजपने व्हिप बजावले आहे. त्यांच्यावर सरकारी वाहनाचा स्वतःसाठी वापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यासाठी त्यांना 'कारणे दाखवा' नोटीसही बजावली आहे. तसेच, या वाहनाच्या चालकालाही कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
सध्या राजस्थानातील कोटा कोविड 19 चा हॉटस्पॉट बनले आहे. येथे विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी राज्य सरकारने अनेक वाहनांची व्यवस्था केली आहे. असे असताना स्वतंत्र परवाना घेऊन स्वतःच्या मुलीला परत आणण्यासाठी गेलेल्या भाजप आमदारावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.