पाटणा - बिहार विधानसभा निवडणूक जवळ आली असून राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि 'महागठबंधन'मध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी रंगल्या आहेत. रोहतास जिल्ह्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी आज(गुरुवार) जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि आरजेडीवर जोरदार निशाणा साधला. तसेच भाजपा आणि जेडीयूच्या विकास कामांची जनतेला माहिती दिली.आरजेडीने चारा घोटाळा करून राज्याचे कुरण बनवून टाकल्याचे नड्डा म्हणाले.
पंतप्रधान मोदींचे नाव न घेता नड्डा यांनी ५६ इंच छातीचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी भाजपा जेडीयूने राज्यात केलेल्या विकासकामांची माहिती दिली. तर काँग्रेस आरजेडीवर निशाणा साधला. आरजेडीने चारा घोटाळा करून राज्याचे कुरण बनवून टाकल्याचे नड्डा म्हणाले. लालू प्रसाद यादव यांच्या सत्ताकाळात गोपालगंजच्या दलित जिल्हाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली, उद्योजक राज्यातून निघून गेले, असे ते म्हणाले.
बिहारमध्ये एनडीएचे सरकार आल्यानंतर स्थिती सुधारल्याचा दावा नड्डा यांनी केला. एनडीएची सत्ता येण्याआधी राज्यात फक्त २४ टक्के भागात वीज पोहोचली होती. मात्र, आता राज्यात १०० टक्के वीज पोहोचली आहे. आता आरजेडीचे नेतेही विकासाच्या गप्पा मारत आहेत. मोदींनी त्यांना विकास काय असतो हे समजून सांगितले. बिहारी जनतेच्या काय अपेक्षा आहेत, त्या आता त्यांनाही(आरजेडी) समजल्या आहेत, असा टोला नड्डा यांनी लगावला.